- Home
- Mediacoverage
- Dr Rajeshwari Pawar
Dr Rajeshwari Pawar


लॉकडाऊन कालावधीत पीसीओएसच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ
थोडं पण कामाचं
- लॉकडाऊन कालावधीत पीसीओएसच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ
- पीसीओएस हा प्रजनन वयातील स्त्रियांमध्ये सामान्यतः दिसणारा गंभीर अंतःस्रावी विकार
- पीसीओएस असलेल्या वृद्ध स्त्रियांमध्ये सामान्य समस्या म्हणजे रक्तातील साखरेच्या पातळीतील वाढ आणि उच्च रक्तदाब
पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम अर्थात पीसीओएसच्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन कालावधीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सतत घरात राहणे, बैठे काम, शारीरिक हालचाली कमी होणे, ताणतणाव, जंक फूडचे अतिसेवन, पुरेशी झोप न होणे याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ लागले आहेत. पीसीओएस प्रकरणांमध्ये संबंधित महिलेला स्थूलतेचाही त्रास होतो. ही स्थिती औषधोपचार, वजन व्यवस्थापन, व्यायाम, पौष्टिक आहार आणि गर्भवती होण्यात अडचण आल्यास सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाची मदत घेऊन दूर केली जाऊ शकते; असे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या.
पीसीओएस हा प्रजनन वयातील स्त्रियांमध्ये सामान्यतः दिसणारा गंभीर अंतःस्रावी विकार आहे ज्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होते. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये पुरुष हार्मोन्सचे उत्पादन जास्त असते, ते इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात, ज्यामुळे वजन वाढते आणि केसांची अवांछित वाढ होते. पीसीओएसच्या इतर लक्षणांपैकी त्वचेवर पुरळ येणे, काळे डाग आणि वजन वाढणे ही लक्षणे दिसून येतात. ही स्थिती उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि वंध्यत्व आदी आजारांना आमंत्रित करते. पीसीओएसबाबत जागरुकता असणे अधिक गरजेचे आहे. तारुण्यात प्रामुख्याने विशीच्या काळात चुकीची जीवनशैली अंगिकारल्यास पीसीओएसचा त्रास होण्याची शक्यता बळावते.
पीसीओएस असलेल्या वृद्ध स्त्रियांमध्ये सामान्य समस्या म्हणजे रक्तातील साखरेच्या पातळीतील वाढ आणि उच्च रक्तदाब अशी आहे. ज्या महिलांना आधीच पीसीओएस होता त्यांनाही लॉकडाऊन कालावधीत अडचणी उद्भवल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी ज्यांनी त्यांच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले होते, त्यांनाही चुकीच्या जीवनशैलीमुळे पुन्हा ती लक्षणे दिसू लागली आहेत.अनेक किशोरवयीन मुली पीसीओएसची लक्षणे जसे की पुरळ आणि चेहऱ्यावरील केसांची तक्रार घेऊन रुग्णालयात उपाचाराकरिता दाखल होत आहेत.
पीसीओएस स्त्रियांमध्ये वंध्यत्व आणि ओव्हुलेटरी डिसऑर्डरचे एक कारण आहे. परंतु, पीसीओएस असलेल्या स्त्रिया सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे गर्भवती होण्यास प्रयत्न करतात. पुरुष सेक्स हार्मोन्स (अँड्रोजन) चे उच्च स्तर आणि असामान्य साखरेचे प्रमाण स्त्रीच्या मासिक पाळीवर परिणाम करते. पीसीओएस नियमितपणे अंड्याचे उत्पादन प्रतिबंधित करते त्यामुळे गर्भधारणेस अडथळे येऊ शकतात. प्रजनन उपचार घेणाऱ्या दहा जोडप्यांपैकी जवळजवळ सहा जोडप्यांना वंध्यत्वाचे कारण म्हणून पीसीओएसचा सामना करावा लागतो; असे फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. करिश्मा डाफळे म्हणाल्या.
पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये नैराश्य, चिडचिड, ताणतणाव, सतत मूड स्विंग होणे, चिंता या समस्या हमखास दिसतात. चेहऱ्यावर जास्त केस, अनियमित मासिक पाळी आणि वजन वाढणे हे स्त्रियांसाठी लाजिरवाणे आणि स्वाभिमान कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते. काही स्त्रिया समाजात वावरणे टाळतात आणि त्यांना एकटेपणासारख्या समस्या भेडसावतात. योग्य जीवनशैली बदलणे आणि पीसीओएस असलेल्या महिलांनी प्रजनन तज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गर्भवती होण्यास फायदेशीर ठरु शकते; असे डॉ. करिश्मा डाफळे म्हणाल्या.
पीसीओएस नियंत्रित करण्यासाठी दररोज संतुलित आहार घ्या, दररोज व्यायाम करा आणि आपल्या रक्तातील साखरेची पातळी आणि उच्च रक्तदाबाचे नियमित निरीक्षण करा. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, शेंगा आणि डाळींचा आहारात समावेश करा. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन टाळा ज्यामुळे वजन वाढते. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड रहा, शर्करायुक्त पेयांना नाही म्हणा, पुरेसा सूर्यप्रकाश मिळवा आणि योग किंवा ध्यान करून तणावमुक्त रहा. वंध्यत्व टाळण्यासाठी पीसीओएसवर उपचार घेण्यास विलंब करू नका असे डॉ राजेश्वरी पवार यांनी सांगितले.